फडणवीस-राऊत भेटीने आघाडीच्या गाडीला लागणार ब्रेक!
सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता न मिळाल्याने सैरभैर झालेल्या भाजपाने केंद्राच्या अखत्यारितील सीबीआय या अस्त्राचा वापर करून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुख्यमंत्र्याच्या चिरंजीवाला या प्रकरणात गोवण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा त्याचाच भाग आहे. सेनेचे खा. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट. या भेटीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडीची गाडी ब्रेक करण्याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आघाडीच्या गाडीला वर्षभरातच ब्रेक लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सेना भाजपने एकत्रीत निवडणूक लढविली. पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदाचे वाटप यावरून सेना, भाजपामध्ये वाद निर्माण झाला. मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचा मुद्दा सोडूनबोला असा हट्ट भाजपाने धरला. त्यामुळे 28 वर्षाची युती अखेर तुटली. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 105 जागा भाजपाला मिळाल्या, बहुमत मिळाले नाही. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. सतत भाजपाकडून होणार्या अपमानामुळे शिवसेनेने गेली चार दशके ज्या पक्षाशी लढा दिला त्या काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीनेही पुढाकार घेतल्याने तीन पक्षांची आघाडी झाली. गेल्या 11 महिन्यापासून या आघाडीचे सरकार राज्यात आहे. पण जून महिन्यज्ञात सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सेनेचे युवानेते आदित्य ठाकरे उपस्थित असल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी दोन महिने तपासाला गांभीर्याने घेतले नाही. पण हा तपास सीबीआयकडे दिल्याने आदित्य ठाकरे अडचणीत सापडले. सीबीआयचा तपास सुरू आहे. त्यांनी केलेल्या तपासात काही धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार शिेवसेनेला कोंडीत पकडत आहे. सीबीआयचे भूत सेनेच्या मानगुटीवर बसवून सेनला जेरीस आणले जात असल्याचे बोलले जात आहे. आदित्यच्या अडचणीत वाढ होऊ द्यावयाची नसेल तर आघाडीच्या गाडीला ब्रेक लावण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे सेना, भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राऊत-फडणवीस यांच्यात अडीच तास चर्चा झाली. या भेटीमागे राजकारण नव्हे तर दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली असल्याचा खुलासा खा. राऊत यांनी केला आहे. पण ही न पटण्यासारखी बाब आहे. भाजप नेत्यांनी ही आम्ही सरकार पाडणार नाही. सरकार अंतर्गत लाथाळ्यामुळे पडणार आहे. असा सूर आळवला पण राऊत, फडणवीस यांच्या भेटीत आदित्यभोवती आवळलेला फास ढिला करण्याबाबत चर्चा झाली असावी असेही बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात मोठा धमाका होण्याची शक्यता आहे.